नागपूर - बुधवारी दिवसभरात नागपूर शहरात २५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्ह आलेले रुग्ण शहरातील विविध भागांमधील आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार ८९० इतकी झाली आहे. नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजार ३९९ इतकी झाली आहे. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७४ टक्के इतके आहे. तर मृत्यू दर १.५८ इतका झाला आहे.
बुधवारी आढळलेले रुग्ण हे गोपाल नगर, हजारी पहाड, अजनी, सोमलवाडा, धरमपेठ येथील रहिवासी आहेत. जिल्ह्यातील काटोल येथे सुद्धा आठ रुग्णांची भर पडलेली आहे. बुधवारी २५ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार ८९० इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांचे प्रशासनाने आधीच अलगीकरण केले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आज १५ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजार ३९९ इतकी झाली आहे. या शिवाय बुधवारी तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये नागपूर शहरातील एका रुग्णांसह अमरावती आणि मध्यप्रदेश येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.
नागपूरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३० झाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे एकाच दिवशी तीन रुग्णांचा मृत्यू होण्याची ही नागपुरातील पहिलीच घटना आहे. सध्या नागपूरात ४६१ सक्रिय रुग्णांवर मेयो, मेडिकल, एम्स आणि मिलिटरी हॉस्पिटल कामठी येथे उपचार सुरू आहेत.