नागपूर - जिल्ह्यात सध्या मे महिन्याच्या अखेरच्या दिवसात नागरिकांना उन्हाचा तडाखा बसत आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात म्हणजेच २५ मे पासून नवतपा सुरू होतो. या काळात तापमान ४७-४८ अंश सेल्सिअसपर्यंतसुद्धा जाते, अशी अख्यायिका नागरिकांमधून व्यक्त केली जाते. दरम्यान, नवतपाचा नागरिकांमध्ये गैरसमज असल्याचे, नागपूर प्रादेशिक हवामान खात्याचे महानिर्देशक के. शहा यांनी सांगितले.
मे महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात तापमानामध्ये जास्तीची वाढ पाहायला मिळते. याला ज्योतिष शास्त्रानुसारच्या पंचागामध्ये नवतपा असे म्हटले जाते. मात्र, संशोधनात नवतपा अशी कोणतीही संकल्पना नाही. मे महिन्यात काही वेळा जास्त तापमान असू शकते. तर काही वेळा हलकासा पाऊसही येऊ शकतो. त्यामुळे हवामान खाते नवतपा अशी संकल्पना मानत नसल्याचे शहा यांनी सांगतले.