नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या पीएचडी पूर्वपरीक्षेत (पेट) बदल होणार आहे. विद्यापीठाकडून यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. पूर्वपरीक्षेतील दोन पेपर न घेता एकच पेपर ठेवण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. यासाठी विद्यापीठाकडून विशेष समितीही नेमण्यात आली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
भाग-२ पेपर रद्द होण्याची शक्यता -
पीएचडी पूर्व नोंदणी परीक्षा म्हणजेच पेट परीक्षेत आता बदल होण्याची शक्यता आहे. पूर्वपरीक्षेत भाग १ व भाग २ असे दोन पेपर घेतले जातात. मात्र, अनेक संशोधक विद्यार्थी भाग- २चा पेपर उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. शिवाय संशोधन अहवाल सादर करण्यातही विविध अडचणी येतात. याच पार्श्वभूमीवर भाग -२ म्हणजेच पेट-२ हा पेपर रद्द करण्यासाठी विद्यापीठस्तरावर हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.
निर्णयासाठी विशेष समितीची स्थापना -
यासंदर्भातील अधिकृत निर्णय अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर झालेला नाही. मात्र, पीएचडी पूर्व नोंदणी परीक्षेच्या निर्णयासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहेत. ज्याव्दारे संयुक्त बैठक घेऊन पेट -२ रद्द करण्याबाबत विचारविनिमय केला जाणार आहे. पीएचडी संशोधन व संशोधकाला चालना मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. विद्यापीठाने अधिकृतपणे हा निर्णय घेतला तर, पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बाब असणार आहे. आता सर्वांचे लक्ष विशेष समितीच्या अंतिम शिफारशी व निर्णयाकडे लागले आहे.
हेही वाचा - राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला सुरूवात, नीटची यादी मिळाली