नागपूर - शहरात कोरोना रुग्णांची संख्या पाचशेच्या (५०१) वर गेली आहे. कोरोनाला पाचशेच्या टप्पा गाठायला ७९ दिवसांचा कालावधी लागला. इतर शहरांच्या तुलनेत हा वेग खूपच कमी आहे. या ७९ दिवसांचे विश्लेषण करताना नागपूर शहराने कोरोनाला पराभूत करण्यासाठी काय प्रयत्न केले यावर नजर टाकणारा ईटीव्ही भारतचा हा आढावा.
पाचशे रूग्ण संख्येचा टप्पा पूर्ण करण्यासाठी नागपूरला ७९ दिवसांचा कालावधी लागला. याचाच अर्थ असा होतो, की नागपूरात कोरोना वाढण्याची सरासरी इतर महानगरांच्या तुलनेत कमी राहिला आहे. गेल्या आठवड्यात नागपुरातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ८० टक्क्यावर गेले होते. मात्र, मागील तीन दिवसांमध्ये तब्बल ६० पेक्षा जास्त रुग्णांची भर पडल्याने रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७१ टक्क्यावर घसरली आहे. या ७९ दिवसांच्या काळात नागपुरातील ३६० रुग्ण बरे देखील झाले आहेत, तर नऊ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
११ मार्चला नागपूरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आला. तेव्हापासून सुरू झालेली ही साखळी तोडण्यात नागपुरातील नागरिकांना अपयश आले आहे. सुरवातीला दिल्लीच्या मरकज येथून परतलेल्या तबलीगींनी नागपूरात कोरोनाचे जाळे पसरवण्यात मोठी भूमिका बजावली. त्यानंतर शहरातील सर्वात पहिला हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा भागातील नागरिकांनी नागपूरला कोरोनाच्या संकटात लोटण्यासाठी १५२ रुग्णांचे योगदान दिले. त्या पाठोपाठ मुस्लीम बहुल परिसरात असलेल्या मोमीनपुरा भागातील तब्बल २०० रुग्णांनी नागपूरवरील कोरोना संकट आणखी गडद केले.
महत्वाचे म्हणजे या ७९ दिवसांच्या कालावधीत सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा भागातून कोरोनाबाधित रूग्ण पुढे येण्याची मालिका आजही सुरूच आहे. प्रशासनाने या दोन्ही भागातुन कोरोना हद्दपार करण्यासाठी सचोटीने प्रयत्न केले मात्र, नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहे. आज नागपूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने पाचशेचा टप्पा ओलांडला असून नऊ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहे. यामध्ये त्या रुग्णाचा देखील समावेश आहे ज्याच्या मृत्यूनंतर सतरंजीपुरा भागातील १५२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून प्रतिबंधित क्षेत्रात कोणताही बदल न झाल्याने आता नागरिकांच्या संयमाचा बांध फुटताना दिसतो आहे. नागरिक रस्त्यावर उतरून प्रशासनाला विरोध करत आहेत. महत्वाच्या वेळी नागरिकांनी प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे. नेमके त्याच वेळी विरोधाची मशाल पेटवून नागरिक ७९ दिवसांच्या मेहनतीवर पाणी टाकण्याचे काम करताना दिसत आहेत.