नागपूर : भाजपा महिला नेत्या हत्या प्रकरणाचं गूढ उकलण्यात अद्याप नागपूर पोलिसांना अजून यश मिळालं नाही. नागपूर पोलीस तांत्रिक पद्धतीनं या हत्या प्रकरणाचा तपास करत आहे. भाजपा महिला नेत्याची हत्या होऊन 25 दिवस उलटलेत, तरीही पोलिसांना या प्रकरणात अद्याप हवं तसं यश मिळालं नाही. पोलिसांना ना अजून मृतदेह मिळाला, ना मोबाईल मिळाला. दरम्यान मोबाईलमधून खूप काही गोष्टींचा उलगडा होईल, असा पोलिसांचा अंदाज असल्याची माहिती झोन 2 चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.
गुगलची मदत : या महिलेच्या मोबाईलमध्ये अनेक रहस्ये दडलेली असू शकतात. या प्रकरणातील अनेक चेहरेदेखील पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी मोबाईल डेटावर लक्ष केंद्रित केलंय. तिच्या मोबाईलमधून अनेक गोष्टी समोर येऊ शकतात. त्याचमुळे आरोपींनी भाजपा नेत्याचा मोबाईल नष्ट केला असावा, असा संशय नागपूर पोलिसांना आहे. दरम्यान या हत्या प्रकरणातील रहस्य बाहेर काढण्यासाठी मोबाईल हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. यासाठी नागपूर पोलीस मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यासाठी गुगलची मदत घेणार आहेत. जर मोबाईलचा डेटा हा क्लाउड किंवा गुगल ड्राईव्हवर स्टोअर असेल, तर गुगलच्या मदतीनं तो परत मिळवला जाऊ शकतो, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.
आरोपींना काँग्रेस आमदाराची मदत : या हत्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील काँग्रेस पक्षाचे आमदार संजय शर्मांची 24 ऑगस्ट रोजी 3 तास चौकशी केली. मुख्य आरोपींना समोरासमोर बसवून आमदार संजय शर्मांची चौकशी करण्यात आली. हत्येनंतर आरोपींनी संजय शर्मा यांना संपर्क साधला होता. संजय शर्मांनी आरोपींना मदत केल्याचा संशय नागपूर पोलिसांना आहे. यासंदर्भात तपास अधिकाऱ्यांनी आमदार संजय शर्मांना काही प्रश्न विचारले. या प्रकरणात माझा संबंध नसल्याचं उत्तर संजय शर्मा यांनी दिलंय.
आरोपी आमदाराकडं होता कामाला : भाजपा नेत्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हा आमदार संजय शर्मा यांच्याकडं कामाला होता. त्यानं 15 वर्षांपूर्वी आमदार शर्मा यांच्याकडं नोकरी केली होती. आमदारांकडील काम सोडल्यानंतर तो त्यांच्या संपर्कात नव्हता, अशी माहिती संजय शर्मांनी चौकशीच्या वेळी दिली. या महिला नेत्याच्या हत्येनंतर आरोपीसोबत भेट झाली होती, पण त्यानं यासंदर्भात त्यांना कोणतीही माहिती दिली नसल्याचंही शर्मांनी पोलिसांना सांगितलं. या हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी रवी शंकर यादवला मी ओळखतो, ते ठेकेदार असल्याची कबुली आमदार शर्मांनी दिली.
तपासावर आई सामधानी पण.. : पोलीस उपायुक्त-2 कार्यालयात आमदार संजय शर्मा आणि आरोपींची चौकशी करण्यात आली. या चौकशीवेळी बेपत्ता भाजपा महिला नेत्याची आईदेखील आल्या होत्या. त्यांची मुलगी बेपत्ता होऊन 24 दिवस उलटलेत. पोलिसांना तिचा मृतदेह अजून का सापडला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांच्या तपासावर समाधानी असल्याचं म्हटलं. नागपूर पोलिसांकडून योग्य पद्धतीनं तपास केला जातो आहे. पण आरोपी पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा आरोप ही त्यांनी केला. तसेच त्यांच्या मुलीवर करण्यात आलेले हनी ट्रॅपचे आरोप त्यांनी फेटाळलेत. हे सर्व आरोप खोटं असल्याचं त्या म्हणाल्या. मुलीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुलीच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हत्येचा तपास कोणत्या दिशेनं : या हत्या प्रकरणाच्या तपासाला अद्याप पाहिजे तशी गती मिळालेली नाही. भाजपा नेत्याचा मृतदेह आणि मोबाईल अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे तपासाला अद्याप कोणतीच दिशा मिळालेली नाही. दरम्यान याप्रकरणी नागपूर पोलिसांनी मुख्य आरोपीसह 5 आरोपींना आधीच अटक केलीय. नागपूर पोलिसांनी संशयितांची चौकशी ही सुरू केल्याची माहिती उपायुक्त मदने यांनी दिली आहे.
असा आहे घटनाक्रम: खून झालेल्या नेत्या 1 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशच्या जबलपूरला गेल्या होत्या. त्यानंतर दोन ऑगस्टनंतर त्यांचा संपर्क होत नव्हता, म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मुख्य आरोपीसोबत त्यांचं लग्न झालं होतं. त्या बिजनेस पार्टनरदेखील होत्या. आरोपीच्या ढाब्यात त्यांनी पैसे गुंतवले होते. तसेच सोन्याचे दागिनेदेखील गिफ्ट केले होते. आरोपीनं दागिने विकल्याचा संशय त्यांना आला, त्यामुळे त्या जबलपूरला गेल्या. त्यानंतर त्यांनी पैशाचा व्यवहार आणि दागिन्यांविषयी विचारणा केली. या कारणावरुन दोघांमध्ये मोठं भांडण झालं. रागाच्या भरात लोखंडी रॉडनं त्यांच्या डोक्यावर वार करत त्यांची हत्या केली असा आरोप आहे.
हेही वाचा-