नागपूर - तलावांमधील माशांच्या चोरीला आळा घालण्यासाठी नागपूरच्या फुटाळा तलावात आजपासून गस्ती नौका सुरू करण्यात आली आहे. राज्याचे दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते गस्ती नौकाचे उद्घाटन करण्यात आले.
राज्यात तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या तलावांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने माशांच्या चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळं मत्स्यपालन करणाऱ्या छोट्या सोसायट्यांना नुकसान होत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने केली जाणारी माशांची चोरी रोखण्यासाठी आजपासून मत्स्यनौका फिरणार आहेत. नागपूरमध्ये प्रसिद्ध असलेल्या फुटाळा तलावामध्ये अशा पद्धतीच्या तीन नौकांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.
राज्यातील प्रमुख तलावांमध्ये नौका तैनात करणार
राज्यात तलावांची संख्या मोठी आहे. मत्स्य चोरी रोखण्यासाठी या तलावांमध्ये सुद्धा गस्ती नौका तैनात केल्या जाणार आहेत. नागपूरपासून याची सुरुवात करण्यात आली आहे. हळूहळू राज्यभरातील सर्व तलावांमध्ये अशा प्रकारच्या गस्ती नौका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सुनील केदार यांनी दिली आहे.