नागपूर - विदर्भावर वरूण राजा रुसल्याने नागपूर शहरातील नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे. पावसाळ्यात पाणी कमतरतेचे संकट ओढवल्याने शहर महापालिकेच्या जलप्रदाय समितीने आठवडाभर एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूरकरांना मोठी समस्या होणार आहे.
देशासहित राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस सुरु आहे. मात्र, विदर्भासह नागपूरवर वरूण राजा कोपल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह आणि पेंच प्रकल्पातील पाणी साठा जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नागपूर शहरावरील पाणी टंचाई अधिक तीव्र झाली असून याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. पाणी कमतरतेमुळे पालिकेने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांच्या समस्येत भर पडणार असल्याची शक्यता आहे. सध्या शहरात ऐतिहासिक पाणी टंचाई असून इतिहासात पाहिल्यांदाच एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे. मात्र, आगामी काळात पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेला इतर पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.