नागपूर - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी एक धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. शहरात मोकाट जनावरे सोडून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या ११ जणांविरुद्ध महापालिकेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शहरात १ हजारावर गोठे आहेत. सोबतच अनेकजण घरी जनावरे पाळतात, त्यांचे दूध काढले जाते. दूध देणे बंद झाल्यावर त्यांना मोकाट सोडण्यात येते. मोकाट जनावरे रस्त्यावर आली की, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यामुळे अनेकदा अपघातसुद्धा होतात. त्यामुळे, महापालिकेने रस्त्यावर जनावरांना मोकाट सोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, या कारवाईचा आवश्यक तो फायदा झाला नाही. त्यामुळे, महापालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे हे शहरात येताच त्यांनी गोपालकांवर धडक कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ११ गोपालकांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महापालिकेच्या धडक कारवाईनंतर आता तरी रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांपासून नागपूरकरांना मुक्ती मिळेल का, हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा- होळीच्या तोंडावर राज्य उत्पादक शुल्क विभाग सक्रिय, अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई