नागपूर - नागपूर महापालिकेने नागरिकांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी हिट ऍक्शन प्लॅन हाती घेतला आहे. दुपारच्या वेळेत सर्वसामान्य नागरिकांना विश्राम घेता यावा, याकरिता महापालिकेने सगळे उद्यान दुपारीच्या वेळी उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने नागरिकांसाठी सुरु केलेल्या हिट ऍक्शन प्लॅन अंतर्गत केलेल्या दाव्यांचा फज्जा उडाल्याचे परिस्थिती बघायला मिळत आहे.
नागपूर शहर सध्या उन्हाचा पारा खूप वरपर्यंत गेला आहे. सूर्याचा ताप वाढला असल्याने नागपूरसह संपूर्ण विदर्भाची भूमी तापलेली आहे. उन्हाचे चटके असह्य होत असल्याने नागरिकांना रस्त्यावर चालताना त्याचा त्रास जाणवत आहे. अश्यात अनेक कामगार भर उन्हात काम करतात दिसत आहेत. त्यांना दुपारचा विसावा सुद्धा मिळत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दुपारच्यावेळत कामगारांना विश्रांती मिळावी याकरिता नागपूर महानगर पालिकेने शहरातील सगळी उद्यान दुपारच्या वेळी सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याशिवाय महापालिकेची वेगवेगळ्या ठिकाणी पाणपोई लावण्याची योजना देखील आहे, ज्यामुळे वाटसरूंना पिण्याचे पाणी मिळेल. महापालिकेने शहराच्या अनेक ठिकाणी तापमान विषयी माहिती देणारे फलक सुद्धा लावण्यात आले. हे सगळे महापालिका हिट ऍक्शन प्लॅन अंतर्गत करत असल्याचा दावा करीत असली तरी अजूनपर्यंत पाहिजे त्या सुविधा देण्यात महापालिकेला अपयश आले आहे. नागपुरातील काही नागरिक सामाजिक भावना जपत काही सिग्नलवर ग्रीन शेड लावून आणि थंड पाणी वाटप करून वाटसरूंना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. महानगर पालिकेने केलेल्या दाव्यांचा फज्जा उडाल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. महापालिका केवळ आपली उद्यान उघडे ठेऊन हिट ऍक्शन प्लॅन राबवत आहे का? असा प्रश्न प्रकर्षाने जाणवतो आहे