नागपूर : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात महामेट्रोकडून तिकीट दरांमध्ये मोठी सवलत दिलेली होती. 16 जानेवारीला सवलत बंद केल्यानंतर सलग दोनवेळा मेट्रोची तिकीट दरवाढ झाली आहे. सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे मेट्रोचे भाडे होते, त्यामुळे प्रवाशांची पहिली पसंती मेट्रोला मिळाली होती. मात्र, आता मेट्रोचे देखील बजेट बाहेर गेले आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महामेट्रोकडून सवलतीच्या दरात तिकिटांची विक्री सुरू करण्यात आली होती. मात्र, आता 15 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी 20 ऐवजी 41 रुपये मोजावे लागणार आहेत.
इंधन दरवाढीमुळे मेट्रोकडे वळले : इंधन दरवाढीची झळ सर्वांनाचं बसल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजे बसचे तिकीट वाढले. त्यामुळे नागपूरकरांनी मेट्रोच्या प्रवासाला सुरुवात केली होती. केवळ 5 आणि 10 रुपयांमध्ये वातानुकूलित प्रवास होत असल्याने प्रवाशांनी मेट्रोच्या प्रवासाला भरभरून प्रतिसाद दिला. दिवसभरात एक लाखांपेक्षा अधिक प्रवासी रोज प्रवास करत आहेत. सवलतीच्या दरात प्रवास आणि वेळेची बचत म्हणून देखील मेट्रो नागपूरकरांच्या पसंतीला उतरली आहे. मात्र, आता तिकीट दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवासी संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
असे आहेत तिकीट दर : नागपूर मेट्रोने सवलतीच्या दरात तिकीट सेवा सुरू केल्यानंतर कमीत कमी पाच रुपये आणि जास्तीत जास्त दहा रुपये तिकीट दर आकारले जात होते. मात्र, आता तिकीटदरांची सवलत काढल्यानंतर शून्य ते दोन किलोमीटर अंतर प्रवास करायचा असले, तर दहा रुपते तिकीट दर निश्चित करण्यात आले आहे. दोन ते 4 किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी पंधरा रुपयांचे तिकीट काढावे लागेल. चार ते सहा किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी 20 रुपये तिकीट दर असतील. 6 ते 9 किलोमीटर अंतरासाठी दहा रुपयांच्या ऐवजी 25 रुपयांचे तिकीट लागेल. 9 ते 12 किलोमीटर प्रवासासाठी 30 आणि 12 ते 15 किलोमीटर अंतराच्या प्रवासाला 30 रुपयांचे तिकीट लागणार आहे. तर 15 पेक्षा अधिक किलोमीटर अंतरासाठी सर्वाधिक 35 रुपये खर्च करावे लागणार आहेत. आणि 18 किलो मीटर पेक्षा अधिकच्या प्रवासाला 41 रुपये भाडे आकारण्यात येत आहेत. याचा अर्थ असा की, खापरी ते ऑटोमोटिव्ह स्टेशनपर्यंत 41 रुपये खर्च येईल, पूर्वी एवढ्याचं प्रवासासाठी केवळ २० रुपये खर्च येत होता.
रायडरशिपने २ लाखांचा टप्पा पार : २०२२ मध्ये रायडरशिपचे नवीन उच्चांक गाठल्यावर, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर मेट्रोने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. रविवारी महामेट्रोची रायडरशिप 2 लाख 02 हजार 608 इतकी होती. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-1 पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांनंतर महामेट्रोने हा महत्वाचा टप्पा गाठला. नागपूर मेट्रोने हा आकडा मेट्रो गाडीच्या डब्यातील तसेच स्टेशनवरील गर्दी या वाढलेल्या रायडरशीपचे प्रमाण आहे.
प्रजासत्ताक दिनी मेट्रोत तोबा गर्दी : प्रजासत्ताक दिनाचे निमित्त नागपूरकरांनी मेट्रो प्रवासाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण दिवसभर नागपूर मेट्रो तुडुंब गर्दी घेऊन धावत होती. शेवटच्या मेट्रो फेरीनंतर प्रवासी संख्या जवळजवळ दोन लाखाच्या घरात पोहचली. १, ९६, १६५ इतकी प्रवासी संख्या ही आजवरच्या विक्रमी प्रवासी संख्येनंतरची दुसरी विक्रमी संख्या ठरली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच सुरू झालेल्या दोन मार्गिकांवर प्रवाश्यांची गर्दी अनुभवायला मिळत आहे. किंबहुना, गेल्या काही काळापासूनचा ट्रेंड पाहता, महामेट्रोच्या प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या बाबींचा विचार करून आणि या प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा अंदाज घेऊन, महामेट्रोने सर्व स्तरांवर आवश्यक कर्मचारी तैनात केले होते.
शहराच्या चहु बाजूने मेट्रोसेवा : मेट्रोच्या कामठी मार्ग तसेच सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर मेट्रो सुरू होण्याची नागरिक प्रतिक्षा करीत होते. नागपूर मेट्रो आता शहराच्या चारही बाजूने सुरु झाली आहे. यामध्ये कॉलेज व शाळेत जाणारे विद्यार्थी, नौकरीदार तसे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मेट्रोने प्रवास करत आहे. सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा नागरिकांकरता उपलब्ध आहे.