नागपूर - केंद्रीय अर्थसंकल्पातील १६ कलमी कार्यक्रम एक धूळफेक असल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिली आहे. तसेच सरकारने पतपुरवठा, हमीभाव पीकविमा योजना सुधारणेला बगल दिल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प केल्यानंतर किशोर तिवारी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तिवारी हे महाराष्ट्र शेतकरी मिशनचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कृषी सल्लागार आहेत.
पुढे ते म्हणाले, सध्या स्थुल घरगुती उत्पादनाचा (जीडीपी) निर्देशांक घसरत आहे. भारतात आर्थिक संकट वाढतच आहे. केंद्रीय अर्थ मंत्र्यांनी यावर्षी अर्थसंकल्प सादर केलेला 16 कलमी कार्यक्रम एक धूळफेक आहे. यामुळे कृषी संकट वाढणार आहे. कारण, मागील ६ वर्षातील सरकारच्या विकासाच्या आणि आर्थिक धोरणाच्या चुका आहेत. यामुळे सर्वात जास्त संकट ग्रामीण क्षेत्रात आले आहे. शेतकरी सर्वात जास्त आर्थिक अडचणीत आला आहे. सगळे व्यवसाय धोक्यात आले आहेत.
हेही वाचा - इतिहासातील सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण; पण तब्येत बिघडल्याने राहिले अपूर्ण
या आर्थिक आणीबाणीच्या वेळी फक्त कृषी क्षेत्रातील गुंतवतणूक वा मूळ धोरणात्मक बदल भारताला बाहेर काढू शकतो. म्हणून येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी कमीत कमी ३ लाख कोटींचे राष्ट्रीय पॅकेज द्यावे, अशी विनंती शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांनी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांना केली होती. मात्र, त्याला संपूर्ण बगल देण्यात आल्याचे ते म्हणाले आहेत. यामुळे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.