नागपूर - इंधन दरवाढीच्या विरोधात नागपूर मेडिकल चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने गांधीगिरी आंदोलन केले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून निघालेल्या वाहनचालकांना गुलाबाचे फुल देत इंधन दरवाढीच्या शुभेच्छा दिल्या.
मोदी सरकारने केली फसवणूक -
खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधन दरवाढ सुरू केलेली आहे. इंधनाचे दर आता सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. वाढत्या इंधन दरवाढीच्या बाबतीत सरकारने कोणत्याही उपाय योजना केलेल्या नाहीत. केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि दक्षिण नागपूर काँग्रेस कमिटीच्यावतीने मेडिकल चौक पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन पेट्रोल दरवाढीच्या शुभेच्छा देत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निच्चांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही. याउलट केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढच होत गेली आहे. असे करून केंद्र सरकार जनतेला आर्थिक संकटात लोटत असल्याचा आरोप काँग्रेसने केले आहेत.