नागपूर - जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कोरोनावर मात केल्यानंतर प्लाझ्मा दान केला आहे. प्लाझ्मा देणेही रक्तदानासारखीच प्रक्रिया आहे. कोरोनामधून बरे झालेल्यांनी दान केलेला प्लाझ्मा अत्यवस्थ वा गंभीर कोरोना रुग्णांना दिला जातो.
कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले. ते म्हणाले, 'मी मागील महिन्यात कोविड पॉझिटिव्ह झालो होतो. उपचारानंतर आता मी पूर्णपणे बरा झालो आहे. यादरम्यान शरीरात कोरोना विषाणूचा प्रतिकार करणारी प्रतिजैविके (ॲन्टिबॉडीज) तयार झाली आहेत. रक्तातील हा प्लाज्मा वेगळा करुन अन्य गंभीर कोविड रुग्णाला दिल्यास कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मदत करतो. त्यामुळेच स्वतःची नैतिक जबाबदारी ओळखून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जावून प्लाझ्मा दान केला आहे'. असे ते म्हणाले. तसेच, कोविडमधून बरे झालेल्या प्रत्येकाने प्लाझ्मा दान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. जिल्हाधिकारी ठाकरेंनी दोन बॅगमध्ये प्रत्येकी 215 एमएल याप्रमाणे 430 एमएल प्लाझ्मा दान केला.
प्लाझ्मा दान प्रक्रिया -
शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील प्लाझ्मा बँक प्लाटिना प्रोजेक्ट अंतर्गत ॲन्टिबॉडीज पॉझिटिव्ह झाल्यानंतर साधारणतः 28 दिवसानंतर प्लाझ्मा दान करता येतो. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 72 दात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. 58 अतिगंभीर कोरोना रुग्णांना हा प्लाझ्मा देण्यात येणार आहे.