नागपूर - तब्बल सात महिन्यांनी नागपूर शहरात 'आपली बस' सेवा सुरू झालेली आहे. पहिल्या टप्यात केवळ ९० बसेस सुरू करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. बसेस कमी असल्याने ऑटो चालकांनी दर वाढवले आहे. ऑटो चालकांकडून प्रवाशांची लूट होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
'आपली बस'ला सर्वसामान्य नागपुरकरांची जन-वहिनी समजली जाते. शहरातील प्रत्येक भागात बसच्या फेऱ्या होत असतात. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या सात महिन्यांपेक्षा जास्त काळापासू बस सेवा बंद होती. त्यामुळे पालिकेच्या परिवहन विभागाला सुमारे वीस कोटींचा आर्थिंक फटका बसला. अनलॉककडे वाटचाल होत असताना शहरातील बस सेवा सुरू करण्याची मागणी नागपुरकरांकडून होत होती. त्यामुळे 'आपली बस' नागपुरकरांच्या सेवेत पुन्हा रुजू झाली आहे. ही बस सेवा आजपासून (बुधवार) सुरू करणार असल्याचा निर्णय महापालिकेचे आयुक्त राधुकृष्णन बी यांनी घेतला आहे. त्यानुसार शहरातील 40 प्रमुख मार्गावर बसेस धावणार आहेत.
शहरात आपली बस सेवेचे चार डेपो आहेत. या चार डेपोमध्ये ९० बसेस विभागण्यात आले आहेत. प्रत्येक डेपोला मोजक्याच बसेस मिळाल्या आहेत. सर्वात महत्वाचा डेपो असलेल्या मोरभवन डेपोत सर्वाधिक ४० बसेस देण्यात आल्या आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या प्रवाशांच्या अडचणी अजूनही कायम आहे. परिवहन विभागाला कोट्यवधींचा फटका बसल्याने तिकिटांचे दर वाढवले जाण्याची शक्यता आहे.