नागपूर- केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ भारत सर्वेक्षण जानेवारी २०२० मध्ये करण्यात आले होते. या सर्वेक्षणात नागपूर शहराने १८ वा क्रमांक पटकावला आहे. मागच्या वर्षीच्या सर्वेक्षणात नागपूर हे ५८ व्या क्रमांकावर होते. या वर्षी रँकिंगमध्ये नागपूर शहराने मोठी भरारी घेतली आहे. केंद्र शासनाचे गृह निर्माण आणि शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिल्लीमध्ये सर्वेक्षणाचा निकाल घोषित केला.
गृह निर्माण आणि शहर विकास मंत्रालयाव्दारे घोषित केलेल्या निकालानुसार महाराष्ट्रातील १० शहरांपैकी नागपूर शहर हे पाचव्या क्रमांकावर आहे. नागपूरला ४ हजार ३४५ गुण स्पर्धेमध्ये प्राप्त झाले आहे. शहराला सर्व्हीस लेवल प्रोग्रेसमध्ये १ हजार ५०० पैकी १ हजार २०८, सर्टिफिकेशनमध्ये १ हजार ५०० पैकी ५००, प्रत्यक्ष निरीक्षणामध्ये १ हजार ५०० पैकी १ हजार ३५४ आणि नागरिकांचे प्रतिसाद श्रेणीमध्ये १ हजार ५०० पैकी १ हजार २८३ गुण मिळाले आहे.
नागपूरला मागील वर्षी ६३.२२ टक्के गुण भेटले होते. यावर्षी ७२.४ टक्के गुण प्राप्त झाले आहे. महापौर संदीप जोशी यांनी नागपूरचा स्वच्छ भारत सर्वेक्षणात १८ वा क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल नागपूर मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सांगितले की, तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागासह मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागपूर शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती. या सर्वांचे महापौरांनी अभिनंदन केले आहे.
स्वच्छतेसाठी 'मम्मी पापा यू टू' मोहीम हाती घेण्यात आली होती. या अभियानात ३ लाख शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यावर्षीसुद्धा मनपा टीमने चांगले कार्य करून नागपूरचा रँकिंग पुढे नेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन महापौर जोशी यांनी केले. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देखील मनपाच्या टीमचे अभिनंदन करून नागपूरचे रँकिंग अधिक चांगले होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हेही वाचा- डान्स क्लासेस सुरू करा; रस्त्यावर 'डान्स' करत नृत्यदिग्दर्शकांची शासनाकडे मागणी