नागपूर - नुकत्याच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. याच अनुषंगाने प्रशासन म्हणून कोरोनाबाबत पूर्ण काळजी घेऊनच निवडणुका पार पडणार आहेत, अशी माहिती नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी दिली आहे. पदवीधर निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाय कोरोना संक्रमित असणाऱ्या मतदातांसाठी विशेष व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आल्याची माहीती यावेळी संजीव कुमार यांनी दिली.
कोरोनाबाधित मतदारांसाठी विशेष व्यवस्था -
गेल्या ५ महिन्यांपासून नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने प्रशासनाकडूनही तयारी सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून निवडणूकीबाबत विशेष तयारी करण्यात येत आहे. यात मतदानाच्या ठिकाणी कोरोनासंदर्भात खबरदारी म्हणून प्रत्येक मतदात्याला मास्क, हँडग्लोजचे वितरण करण्यात येणार आहे. शिवाय मतदान ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असल्याची माहीती विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी दिली आहे. ही पदवी निवडणूक कोरोनाच्या काळात असल्याने मतदान ठिकाणी काही ठराविकच लोकांना प्रवेशाची परवानगी देण्यात येणार आहे. सोबतच प्रचारासंदर्भात ५ व्यक्तीच्या गटानुसारच प्रचाराची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती संजीव कुमार यांनी दिली आहे.
कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता थर्मल स्क्रिनिंग करतांना मतदात्याचे तापमान अधिक आढळल्यास त्याला शेवटच्या विशेष तासात मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय पॉझिटिव्ह मतदात्यांसाठीही पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यात आली आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
अधिकार्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण -
या निवडणूकीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून प्रत्येक बाबींवर बारकाईने लक्ष देण्यासाठी नियोजन सुरू असल्याची माहीतीही यावेळी आयुक्त संजीव कुमार यांनी दिली.