नागपूर - राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात घडली. अंगद सिंग असे मृताचे नाव असून तो सावनेर मध्ये 'ऑक्सिजन' नावाच्या जिमचा संचालक होता. हत्येचा हा सगळा थरार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सावनेरमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या वादातून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अंगद सिंग यांना आरोपी नरेंद्र सिंग याने धारदार शस्त्राने मारल्याचे या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. हल्ला होत असताना अंगद यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी नरेंद्रने धारदार शस्त्राने वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. सावनेरमधील नाग मंदिराशेजारी रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हत्या झाली. विशेष म्हणजे मृत आनंद सिंग मंत्री सुनील केदार यांचा अंगरक्षक म्हणून काही दिवस आगोदर काम करायचा. जखमी अंगद याला उपचारासाठी पाटनसावंगी येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. सावनेर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी नरेंद्र सिंग याने घटनेनंतर पोलिसांत आत्मसमर्पण केले आहे.