नागपूर - उपराजधानी नागपूरमध्ये बुधवारी तब्बल 1181 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नागपूरमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. 15 दिवसांपूर्वी 250 ते 300 असणारी संख्या आज हजाराचा आकडा पार करत 1181 वर येऊन पोहचली आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाचा चांगला कस लागत आहे. दरम्यान, बुधवारी 7366 जणांची आरटीपीसीआर चाचणी, तर 3218 जणांची रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात आली.
बुधवारी 1181 रुग्णांची भर -
बुधवारी नागपूरमध्ये 1181 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यापैकी शहरी भागात 955, तर ग्रामीण भागात 224 रुग्णांना अहवाला पॉझिटीव्ह आला आहे. तर एकूण 7184 सक्रिया रुग्ण सध्या उपचार घेत आहे. यापैकी 1352 हे ग्रामीण भागातील, तर 5832 रुग्ण हे शहरातील आहे. तसेच नागपूर शहरातील 7, तर ग्रामीण भागातील 1 आणि बाहेर जिल्ह्यातून आलेल्या 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बाजारातील गर्दीच्या ठिकाणावर असणार नजर -
नागपूर महानगरपालिकेकडून शहरातील विविध भागात असणारे मंगल कार्यालय, लॉन, सभागृह आदींवर नजर ठेवून कारवाई केली जात आहे. तसेच सीताबर्डी, इतवारी, महाल, गांधीबाग, जरीपटका, खामला, धरमपेठ, यासारख्या गर्दीच्या ठिकाणीदेखील कारवाई करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास 50 हजार रुपयापर्यंत दंड करण्यात येत आहे.
मंगलकार्यालय चालक पुन्हा अडचणीत -
मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभात गर्दी होऊ लागली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे 25 फेब्रुवारीपासून मंगलकार्यालये पुढील आदेशापर्यंत बंद असणार आहे. मंगलकार्यलय बंद करणे हा पर्याय नसून क्षमतेनुसार 50 टक्के किंवा 200 लोकांच्या उपस्थितीत ठेवण्याची परवानगी इतर ठिकाणी असताना नागपूरमध्ये का नाही, असा प्रश्न मंगलकार्यालय चालकांनी उपस्थिती केला आहे.
शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढणारे झोन -
हनुमान नगर झोनमधील लाडीकर लेआऊट, गोविंद प्रभू नगर, राजापेठ, धंतोली झोनमध्ये टाटा कॅपिटल हाईट, टॉवर ४, अरिहंत अपार्टमेंट, तेच नेहरू झोनमधील स्वामी नारायण एनक्लेव्ह, सदाशिव नगर, वाठोडा, लकडगंज झोनमध्ये नैवेद्यम इस्टोरिया मंगल कार्यालय, कळमना रोड, मंगळवारी झोनमध्ये गोपाल अपार्टमेंट, मेकोसा बाग, स्टेट बँक ऑफ इंडिया रेल्वे स्थानकाजवळ, लक्ष्मी नगर झोनमध्ये सर्वात जास्त भाग हॉटस्पॉट बनत आहे. यात स्वालंबी नगर, बजाज नगर, जयताळा, लक्ष्मीनगर तात्या टोपीनगर, अशा अन्य काही ठिकाणी रुग्ण संख्या वाढत असल्याने मनपा प्रशासनाकडून खबररदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
हेही वाचा - पतीला पत्नीने चहा बनविण्यास नकार देणे ही गंभीर घटना नाही - उच्च न्यायालय