नागपूर - पगारी नोकरांबद्दल तुम्ही आम्ही सर्वांनीच ऐकलय. पैसे घेऊन काम करणाऱ्यांचीही आपल्याला माहिती आहे. मात्र, नागपूरमध्ये पगार घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्यांना नागपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या पगारदार चोरांमुळे सारेच चक्रावले आहे. बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणारी 1 टोळी शहरात गेल्या काही दिवसांपासून सक्रिय होती. 5 ते 15 हजारापर्यंत पगार या चोरट्यांना मिळायचा. या टोळीत 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
अल्पवयीन मुलांचाही समावेश -
अमरजीतकुमार महतो, विशालकुमार महतो, धर्मेंद्रकुमार मंडल, भोला महतो, आस्तिक घोष, नंदकुमार चौधरी, आणि आफताब इब्रार अंसारी, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. शंका येऊ नये म्हणून त्यांच्या मदतीसाठी 10 अणि 12 वर्षांच्या 2 मुलांचाही समावेश होता.
हेही वाचा - 'विक्रम' तू सिग्नल तोडले तरी आम्ही चालान फाडणार नाही; नागपूर पोलिसांच ट्विट
मोबाईलची थेट बांगलादेशात तस्करी
नागपुरातील नेताजी मार्केटमधुन मोबाईल चोरीच्या प्रकरणात आफताब इब्ररार अन्सारी याला ताब्यात घेतले. त्याने इतर साथीदार जोगी नगरात भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती दिली. त्यानुसार उर्वरित 6 जणांना जोगी नगरातील खोलीतून अटक करण्यात आली आहे. हे चोरटे बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल लंपास करायचे. त्यानंतर चोरलेले मोबाईल झारखंडमध्ये पाठवून देत होते. तिथून थेट बांगलादेशात मोबाईलची तस्करी केली जायची. कारण या टोळीचा म्होरक्या झारखंडला असतो. तो मोबाईल चोरी करण्यासाठी या चोरांना कामानुसार पगारही द्यायचा.
हेही वाचा - नागपूर : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शनिवारी शाळांना सुट्टी, पंतप्रधानांचा दौराही रद्द
महिना १५ हजार रुपये पगार
तसेच नागपूर शहरात या चोरांना पाठवल्यांतर पगाराबरोबरच त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही हा म्होरक्या करायचा. झारखंडच्या टोळीतल्या या चोरांना कामानुसार 5 हजार ते 15 हजारांपर्यंत मोबदला पगार स्वरुपात मिळत होता. ही एकच टोळी असली तरी झारखंडचा म्होरक्या अनेक टोळ्या संचालित करतो. चोऱ्या करणारी मुले वेतनावर त्याच्याकडे काम करतात.
बेरोजगारीमुळे पत्करला चोरीचा मार्ग -
गावी हाताला कामच मिळत नसल्याने कुटुंबाला सहकार्य करण्यासाठी नाइलाज म्हणून सर्व धोके पत्करून तुटपुंज्या मिळकतीसाठी ही मुलं चोऱ्या करतात. त्यामुळे गरीबी आणि बेरोजगारीचा फायदा घेत या तरूणांना चोरी करायला भाग पाडले जाते.