नागपूर - वाढीव वीज बिलावरून राज्यात विविध ठाकाणी आंदोलने सुरू आहेत. अशातच नागपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्यावतीने काळे कपडे घालून ऊर्जामंत्री नितिन राऊत यांना निवेदन देण्यात आले. वाढीव वीज बिल रद्द करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.
वाढीव वीज बिलावरून सर्वत्र आंदोलन सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशातच नागपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने काळे कपडे घालून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आले. नागपुरातील बिजलीनगर येथील ऊर्जामंत्र्यांच्या विश्रामगृहावर हे निवेदन देण्यात आले. दरम्यान, राज्यात कोरोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारकडून जे वाढीव वीज बिल पाठवण्यात आले आहे, ते सर्वसामान्य कसे भरतील? असा सवाल मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी उपस्थित केला आहे. जिथे सामान्य माणसांच्या घरात एक बल्ब आहे, त्यांना देखील सरकार कडून अव्वाचे सव्वा वीज बिल पाठवण्यात आले आहे. सामान्य माणूस कसे भरणार एवढे वीज बिल? असा सवाल या निवेदनातून केला आहे.
दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन देण्यासाठी मनसेचे पदाधिकारी गेले असता ऊर्जामंत्र्यांकडून त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी सांगितले. यापूर्वी देखील मनसेकडून संबंधित अधिकाऱ्यांना सामान्य माणसांच्या भावना कळवल्या आहेत. परंतू, सरकारकडून कासव गतीनेच प्रयत्न चालले आहेत. अद्याप कुठलाही दिलासा दिला गेला नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर १६ टक्के वीज शुल्क माफ करणे सरकारच्या हातात असते. परंतू, सरकारचे मंत्री म्हणून नितीन राऊत यांना करमाफ करण्याचा अधिकार आहे. मात्र, ऊर्जामंत्र्यांनी केंद्राकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे ऊर्जामंत्री नितीन राऊत आपली चूक स्विकार करत नसल्याचा आरोपही यावेळी मनसेकडून करण्यात आला. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच ऊर्जामंत्र्यांना जाब विचारण्यासाठी काळे कपडे घातली आहेत. मात्र, आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचेही यावेळी हेमंत गडकरी यांनी सांगितले.