नागपूर- केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू मुंबईच्या दिशेने निघालेले असताना त्यांना नागपुरात रोखण्यात आलं होतं. मात्र आता त्यांना आंदोलनात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे"शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाण्यासाठी परवानगी दिल्याने मी सरकारचे आभार मानतो," अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी निघताना दिली.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स कार्यालयावर मोर्चा-
दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील रिलायन्स कार्यालयावर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय ते बिकेसीमधील अंबानी, अदानीच्या कार्यालयावर हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना तसेच राज्यातील शेतकरी सामील होणार आहेत.
काहीही झाले तरी मी आंदोलनात सहभागी होणार-
गेल्या महिन्याभरापासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र, त्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही. पंतप्रधांन नरेंद्र मोदीही तोडगा काढण्यासाठी तयार नसल्याचे बच्चू कडू म्हणाले. त्यामुळे काहीही झाले तरी मी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा निर्धार बच्चू कडूंनी बोलून दाखवला होता. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दुपारच्या विमानाने मुंबई जाण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले होते.
कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे बच्चू कडूंच्या भेटीला-
बच्चू कडू हे मंत्री म्हणून नाही तर शेतकरी पुत्र म्हणून लढा देत आहेत. जर हे सरकार कोणाचच ऐकत नसेल तर आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केले. लोंढे हे बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात गेले होते.
काँग्रेस शेतकरी आंदोलनात सहभागी-
शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा खुला पाठींबा आहे. मोदी सरकारचे नवे शेतकरी धोरण चूकीचे असून पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी चर्चा करावी असेही लोंढे म्हणाले. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात आत्तापर्यंत ३३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून एकाने आत्महत्या केली आहे. तर एका ७० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता.
हेही वाचा- जम्मू काश्मीर डीडीसी निवडणुकांचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात, पाहा LIVE अपडेट्स..
हेही वाचा- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी महिला अंमली पदार्थ तस्कराला अटक