नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दोन दिवसीय लघू बैठक आजपासून (3 सप्टेंबर) नागपुरात होणार आहे. रेशीम बाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनात ही बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे हे उपस्थित असणार आहेत. यासोबतच 36 संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित असणार आहेत.
या बैठकीमध्ये संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. वर्षभरात केलेल्या कामांचा आढावा या बैठकीत घेतला जातो. तसेच देशपातळीवर महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन या बैठकीच्या माध्यमातून होत असते. या बैठकीमध्ये भाजपचे लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित असतात.
संघाच्या कामाचा घेतला जाणार आढावा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वात संघ परिवारात काम करणाऱ्या 36 संघटनांची समनव्य बैठक दरवर्षी देशभरात विवध भागात होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही लघु स्वरूपाची ही बैठक असणार आहे. यामध्ये मागील काही महिन्यात झालेल्या संघाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघाच्या संघटनांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत कोरोनाच्या काळात करण्यात आलेल्या सेवा कार्याचा आढावा घेतला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघटनानी काम केले आहे. यासंदर्भात लेख जोखा मांडला जाऊन त्यात पुढील काळात केल्या जाणाऱ्या कामावर सुद्धा मंथन होणार आहे.
पाच राज्यांच्या आगामी निवडणुकांवर होणार चर्चा
या बैठकीत आगामी पाच राज्याच्या ज्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या संदर्भात सुद्धा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस जे संघाचे आणि भाजपमध्ये समन्वयाचे काम करतात ते सुद्धा बैठकीला असणार आहेत. यामुळे राजकीय विषयावर तसेच उत्तर प्रदेशच्या निवडणुकी संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा होणार आहे.
सरकारची ध्येय-धोरणे आणि त्यावर संघाची भूमिका
केंद्रात भाजपची सत्ता आहे. यामुळे सरकारची काही ध्येय-धोरणे आणि त्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका सुद्धा मांडली जाईल. तसेच देशातील महत्वाच्या मुद्द्यासंदर्भातही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर आज ओशिवरा स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार