नागपूर - योग अभ्यास हा भारताने जगाला दिलेला अमूल्य ठेवा आहे. निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचे असल्यास नियमित योगा हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. त्यामुळेच भारतीय योग साधना आता देशविदेशात प्रचलित झाली आहे. योगा करण्याचे विविध प्रकार प्रसिद्ध होत असताना आता त्यात 'सायकल योगा'ची भर पडली आहे. योग दिनानिमित्ताने 'ईटीव्ही भारत'चा खास वृत्तांत...
नागपुरात राहणाऱ्या मंगला पाटील या महिला गेल्या अनेक वर्षांपासून सायकल चालवताना योगा करतात. भल्या पहाटे सायकलवर त्यांचा हा 'सायकल योगा' सुरू होतो. सुदृढ आरोग्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी सायकल योगा हा नाविन्यपूर्ण योगा प्रकार विकसित केला आहे. मंगला पाटील या सायकल चालवतानाच चक्क हॅण्डलचे दोन्ही हात सोडून अनुलोम - विलोम करतात. एवढेच काय त्या विविध प्रकारचे योगाचे वेगवेगळे आसने सायकलवरच करतात. कधी जोरजोरात हात हालवणे, तर कधी पायाच्या करामती त्या करत असतात. हा योगाअभ्यास सुरू असताना त्यांची सायकल चालवण्याची प्रक्रियासुद्धा निरंतर सुरूच असते.
सायकलचा तोल बॅलेन्स करणे आणि रस्त्यावर हात सोडून सायकल चालवणे सहज शक्य नसले, तरी मंगला पाटील यांना ही करामत अगदी सहज जमते. त्यांनी हा योगा प्रकार आज सुरू केलेला नसून, त्या गेल्या २० वर्षांपासून रोज एक ते दीड तास सायकलवर योगा करतात. यात त्यांचा अपघातसुद्धा झाला होता. मात्र, त्यांची जिद्द त्यांना सायकलवर योगा करण्यापासून थांबवू शकली नाही.
सायकल चालवत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत हॅण्डल सांभाळणे आणि सायकलवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते, मात्र त्यांना त्याची काहीच गरज वाटत नाही. रस्त्याने व्यायामासाठी किंवा फिरायला येणारे नागरिक त्यांचे हे योगाचे धडे आवर्जून थांबून बघतात. आपण करत असलेला हा योग प्रकार मंगला यांना इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे. मात्र, तो एवढा सोपा नाही. मंगला या सायकलवर योग साधना करून आपल्या आरोग्याची काळजी घेतातच सोबतच पर्यावरण रक्षणाचासुद्धा संदेश त्या सायकल योगाच्या माध्यमातून निरंतर देत आहेत.