नागपूर - हिवाळी अधिवेशनाकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर शहरात आगमन झाले आहे. यावेळी महाविकास आघाडीतर्फे त्यांचा विमानतळावर जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाला आदित्य ठाकरे यांच्यासह कॅबिनेट मंत्री नितीन राऊत आणि शिवसेनेचे आमदार, खासदार उपस्थित होते. सत्कार सोहळ्यानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला विधीमंडळ कामकाजाचा अनुभव जरी नसला, तरी माझ्याकडे आत्मविश्वास भरपूर आहे आणि याच आत्मविश्वासाच्या जोरावर मी राज्याच्या जनेतचे प्रश्न मार्गी लावणार आहे.
कुणाच्याही ध्यानी मनी नसताना राज्यात तीन पक्ष एकत्र आले. ज्यातून महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे. आता तीनही पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा एक दिलाने एकत्र आले असल्याचा दावाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. हे सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ तर पूर्ण करणारच आहे, शिवाय पुढील अनेक वर्षे सुद्धा हेच सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - जागतिक चहा दिनादिवशी भाजपचा चहापानावर बहिष्कार; अशोक चव्हाणांचा टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्कार सोहळ्याला येताच पावसाने दमदार हजेरी लावली. बाहेर जोरदार पाऊस पडतो आहे, हा जरी शुभ संकेत असला तरी अवकाळी पावसाचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसला आहे, त्याला ते आता नको असे म्हणत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनादरम्यान अनेक प्रश्न आणि समस्या आहेत, याची जाणीव असल्याचे ते म्हणाले. मला कामकाजाचा अनुभव नसला तरी माझ्याकडे आत्मविश्वास आहे. विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशाला अभिमान वाटेल असे सरकार देणार आहोत. जे स्वतःला राज्यकर्ते समजत होते त्यांचा डाव मोडून काढला आहे. मुख्यमंत्री म्हणून माझ्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने उद्या सुरुवात होत असल्याचे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.