नागपूर - जॉय राईडच्या माध्यमातून कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. याउलट रोलिंग स्टॉकचे पैसे वाचवले असल्याचा दावा महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रूजेश दिक्षीत यांनी केला. जॉय राईडच्या माध्यमातून महामेट्रोत ७५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला होता. त्यावरच बुधवारी दिक्षीत यांनी स्पष्टीकरण दिले.
एल अँड टी कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी महामेट्रोने जॉय राईड सुरू केल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला होता. या आरोपांचे खंडन दिक्षीत यांनी केले. मेट्रोचे कोच हे ट्रायलसाठी आणण्यात आले होते. यासाठी ज्या ठिकाणी मेट्रो रेल्वे आहेत. त्यांना विचारणा केली होती. मात्र, तीन कोचेसची मेट्रो एल अँड टी कंपनीकडे आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत करार करण्यात आला असल्याचे दिक्षीत म्हणाले. तसेच नागपूरकरांच्या मागणीनुसार जॉय राईड सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
करार झालेल्या मेट्रो कोचचा पुणे मेट्रोसाठी उपयोग केला जाणार आहे. त्यामुळे ४ वर्षासाठी करार करण्यात आला आहे. तसेच मंजूर निधीपैकी कमी खर्च करीत असल्याचे दिक्षीत म्हणाले.