नागपूर - राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात नागपूरचा समावेश पहिल्या स्तरात करण्यात आला आहे. यामुळे महा मेट्रोनेही आपली सेवा नियमितपणे म्हणजेच दर अर्धा तासाने एक ट्रेन अशा स्वरुपात सुरू केली आहे. सीताबर्डी इंटरचेंजपासून मिहान आणि लोकमान्य नगर अशा या दोनच मार्गांवर ही सेवा दर अर्ध्या तासाने प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.
व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्याना दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांना मेट्रोने प्रवास करण्याची मुभा होती. मात्र, राज्य शासनाच्या नवीन सूचना मिळताच दर ३० मिनिटांनी मेट्रो प्रवासी सेवा देण्याकरिता महा मेट्रो प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाच्या काळात मध्यंतरी अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी दर 1 तासाने मेट्रो सोडली जायची. मात्र, अनलॉकमध्ये आता वेळ पूर्ववत करण्यात आली आहे.
हेही वाचा - बदला घेण्सासाठी प्रेयसीवर अत्याचार करून बनवला व्हिडिओ, तिच्या वाढदिवशी टाकला सोशल मीडियावर
सर्व परिसर सॅनिटाइज, स्टेशन सज्ज -
सीताबर्डी इंटरचेंज ते मिहानपर्यंत मेट्रो सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत धावणार आहे. तर सीताबर्डी इंटरचेंज लोकमान्य नगर दरम्यान मेट्रो सकाळी साडेसहा ते रात्री आठ वाजेदरम्यान धावणार आहे. कोरोना संक्रमणापासून प्रवाशांना वाचवण्यासाठी महामेट्रोने आज सकाळीच सर्व स्टेशनवर सॅनिटायझेशन प्रक्रिया राबवण्यात आली आहे. स्टेशनचा संपूर्ण भाग आणि मेट्रोच्या आतील भागात प्रत्येक कानाकोपऱ्याचे सॅनिटायझेशन करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
प्रवाशांची घेतली जाणार नोंद -
स्थानकावर पोहचण्याअगोदर प्रत्येक प्रवाशांचे शारीरिक तापमान मोजून त्यांना स्टेशनमध्ये प्रवेश दिले जात आहे. त्यानंतर प्रत्येक प्रवाशाची नोंद ठेवून तो कुठून कुठे चालला आहे, याची माहितीही विचारली जात आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा - पोलीस निरीक्षकाचा महिला पोलीस कर्मचाऱ्यावर घरात घुसून बलात्कार
डिजिटल पेमेंट करण्याचे आवाहन -
प्रवाशांनी डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावीत, याकरिता त्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. उपकरणांना स्पर्श कमी व्हावा याकरीता हे पाऊल उचलल्या गेले आहे. महा मेट्रोकडून डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे देताना डिजिटल पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले जात आहे. तरीही नगद पैसे देत तिकीटाचासुद्धा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यात जमा झालेली रोख-रक्कमेचे विशिष्ट उपकरणांच्या माध्यमाने अल्ट्रा-व्हायलेट किरणांच्या मदतीने निर्जंतुकीकरण करण्यात येते. तसेच जाणारी रोख-रक्कम वेगळी ठेवल्या जात आहे.