नागपूर- पतंग उडवणाऱ्यांना नागपूर मेट्रो आणि महानगरपालिकेच्या भूमिकेमुळे संक्रांत येण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या परिसरात पतंग उडवता येणार नाही. त्यासाठीचे आवाहन मेट्रोच्यावतीने केले आहे. शिवाय दुसरीकडे नागपूर महानगरपालिका प्रशासन देखील चायनीज मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाईच्या तयारीत आहे.
हेही वाचा- 'रोजगार कमी होवून उत्पन्न कमी झाल्यास तरुणाईमधील क्रोधाचा उद्रेक होईल'
मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करा. मात्र, मेट्रो लाईनवरून पतंग उडवू नका, असे आवाहन मेट्रोने केले आहे. नागपूर मेट्रो सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन आणि पुढे मिहान डेपो पर्यंत जाते, असे ट्रेनचे नियमित संचालन सुरू असते. तसेच हिंगणा मार्गावर गरजेप्रमाणे आणि अंतर्गत कामानिमित्त मेट्रो ट्रेन सुरू आहे. मेट्रोला चालण्यासाठी २५००० व्होल्ट विद्युत प्रवाहाची गरज असते. ट्रेनच्या संचालनासाठी विद्युत प्रवाह सुरू असतो. पतंगाचा मांजा विद्युत तारांमध्ये अडकल्यास यातून दुर्घटना घडू शकते. सोबतच मेट्रो सेवा सुद्धा प्रभावित होऊ शकते. त्यामुळे पतंग उडवताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन नागपूर मेट्रोच्यावतीने परिसरातील वस्तीत जाऊन करण्यात आले आहे. मकरसंक्रांती निमित्ताने पतंग उडविण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे आवाहन करण्यात आले आहे. याला नागरिकांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागणार आहे.