नागपूर - तीन दिवसांपूर्वी दोन आरोपींनी संगनमत करून चेन्नई येथून अपहरण केलेल्या साडेतीन वर्षीय बालकाची नागपूर लोहमार्ग पोलिसांनी काल (सोमवारी) सुटका केली होती. अपहरण झालेल्या त्या बालकाचा नरबळी दिला जाणार होता. त्याकरिता त्याचे अपहरण करण्यात आले असल्याचा धक्कादायक खुलासा लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या निरीक्षक मनीषा काशिद यांनी केला. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची नागपूर लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर देखील मूल होत नसल्याने एका मंत्रिकाने दिलेल्या सल्लाचे पालन करत त्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करून नरबळी देण्याची योजना आरोपींनी आखली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोनु गरीबदास केवट (२६) आणि शिब्बु गुड्डु केवट हे दोघेही मध्यप्रदेशच्या रायसीन जिल्ह्यातील आहेत. ते कामानिमित्त तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील अंबातूर इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होते. त्यांनी फिर्यादीच्या कुटुंबासोबत ओळख वाढवून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. मुलाला फिरवून आणतो, असे सांगून आरोपींनी त्या चिमुकल्याचे अपहरण केले होते. मात्र, नागपूर लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे त्या बाळाचे प्राण वाचले आहेत. पोलिसांनी त्या बाळाला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधिन केले आहे.
नरबळी देण्यासाठी केले अपहरण -
आरोपी मोनु गरीबदास केवट यांच्या लग्नाला दोन वर्षे झाले होते. तरी बाळ होत नसल्याने त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार करण्याऐवजी एका मंत्रिकाकडे जाऊन उपचार सुरू केले होते. त्या मांत्रिकाने आरोपीला सल्ला दिला की ज्या बालकाचे जावंळ काढलेलं नसेल त्याचा नरबळी दिल्यास तुला मूळ बाळ होईल. त्यानंतर आरोपीने शेजारी राहणाऱ्या चिमुकल्याचे अपहरण केले होते.
हेही वाचा - अनिल परबांचा किरीट सोमैयांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
बाळाच्या सुटकेचा घटनाक्रम -
साडेतीन वर्षीय मुलाच्या अपहरणासंदर्भात नागपूर लोहमार्ग रेल्वे पोलिसांना चेन्नई पोलिसांकडून सूचना देण्यात आली होती. दोन्ही आरोपी तामिळनाडू एक्सप्रेसने नागपूर मार्गे पुढे जात असल्याची माहिती समजताच लोहमार्ग पोलिसांनी संपूर्ण स्टेशनवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. तामिळनाडू एक्सप्रेसने नागपुरात रेल्वे स्टेशनवर येताच लोहमार्ग पोलिसांनी प्रत्येक बोगीची तपासणी सुरू केली. त्याच वेळी DL क्रमांकाच्या बोगीत दोन तरुणांच्या जवळ ४ वर्षीय चिमुकला आढळून आला. लोहमार्ग पोलिसांनी आरोपींची चौकशी केली तेव्हा ते उडवा-उडवीचे उत्तर देत असल्याने त्यांच्यावर संशय अधिकच वाढल्याने पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली तेव्हा त्यांनी चार वर्षीय चिमुकल्याचे अपहरण केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन मुलाची सुखरूप सुटका केली आहे.
लोहमार्ग पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांची कमाल -
लहान मुलाचे अपहरण करून आरोपी तामिळनाडू एक्सप्रेसने नागपूर मार्गे पुढे जात असल्याची सूचना मिळाली होती. यानंतर लोहमार्ग पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी अपर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे आणि पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांच्याकडे या प्रकरणातील आरोपींना जेरबंद करून अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका करण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी व्यूहरचना आखली. त्यानुसार तमिळनाडू एक्सप्रेसच्या प्रत्येक बोगीसमोर लोहमार्ग पोलीस दलातील कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तामिळनाडू एक्सप्रेस फलाटावर येताच कर्मचाऱ्यांनी वायू वेगाने सर्व बोगीची तपासणी सुरू केली असता Dl क्रमांकाच्या बोगीत दोन तरुणांच्या जवळ ४ वर्षीय चिमुकला आढळून आला.