नागपूर - उपराजधानीमध्ये कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अत्यावश्यक सुविधांसह तपासणीसाठी आवश्यक असलेल्या किट्स पुरेशा प्रमाणात तयार ठेवण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने देखील आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
कोरोनासंदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नागपुरातील आमदार, खासदार, महापौर आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासणीसाठी मेयो आणि एम्स येथे सुविधा उत्तम असून वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयात लवकरच सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. कोरोना संशयित आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करणे आवश्यक आहे, यासाठी आवश्यक असलेल्या तपासणी किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन घेण्याच्या सूचना नितीन गडकरी यांनी केल्या आहेत.
विविध संस्थांच्या माध्यमातून डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफकरिता 15 हजार असलेल्या सुरक्षा किट शासनाच्या उपलब्ध निधीमधून खरेदी करण्याच्या सूचना गडकरींनी दिल्या. वैद्यकीयमहाविद्यालयात ट्रॉमा केअरचा 220 बेड असलेला स्वतंत्र कोरोना वार्ड तयार करण्यात येत आहे. मेयो आणि शासकीय वैद्यकाय महाविद्यालयात व्हेंटिलेटरची सुविधा, अतिरिक्त रुग्णवाहिका, शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये आयसीयु सुविधा आहेत, अशा सर्व रुग्णालयांचे सेवा घेण्याच्या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देशही गडकरी यांनी दिले.