मुंबई - बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरमध्येच जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांनी वर्चस्व निर्माण केले आहे. ज्या नागपुरमध्ये भाजपचे दिग्गज नेते आहेत, तिथेच त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपच्या विदर्भातील पराभवाची सुरुवात नागपूरपासून झाल्याचे वक्तव्य जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.
राज्यातील सत्तांतरामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चांगलीच मोर्चेबांधणी केली होती. यामध्ये त्यांना भाजपचा पराभव करण्यात यश मिळाले आहे. निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर टोलेबाजी केली. नागपूर जिल्हा परिषद निवडणूक वारंवार पुढे ढकलली जात होती. भाजप निवडणुकीला टाळत होती. मात्र, आज निवडणूक झाली. जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या पारड्यात आपले मत टाकल्याचे पाटील म्हणाले.
ज्या नागपुरात भाजपचे दिग्गज नेते आहेत. जिथे भाजपची चांगली कमांड होती. आज त्याच नागपुरात भाजपचा पराभव झाल्याचे पाटील म्हणाले.