नागपूर - येथील महाराजबाग प्राणी संग्रहालयातील जान वाघिणीच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. जानला सर्दी झाल्याने तिचे नाक वाहत होते. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून महाराजबाग प्रशासनाने जानची कोरोना चाचणी करून घेतली होती. दोन दिवसांपूर्वी जानची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर जानची विलगीकरणातून मुक्तता करण्यात आली. सध्या जानची रवानगी खुल्या पिंजऱ्यात करण्यात आली आहे. मोकळ्या वातावरणात आल्याने जान वाघिणीमध्ये उत्साह परत आला आहे. मात्र, पुढील काही दिवस जानच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. जानच्या तब्येतीत संशयास्पद काही जाणवल्यास पुन्हा कोरोना चाचणी करण्याचा पर्याय खुला असल्याचं मत महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे प्रभारी सुनील बावसकर यांनी व्यक्त केले आहे.
सध्या महाराजबाग प्राणी संग्रहालयात मोठ्या प्रमाणात प्राणी आहेत. ज्यामध्ये वाघ, अस्वल, बिबट, हरीण यांचा समावेश आहे. कोरोनामुळे हे प्राणी संग्रहालय बंद आहे. माणसापासून प्राण्यांनासुद्धा कोरोना होऊ शकतो, हे पुढे आल्यानंतर प्रशासनाने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वावर देखील कमी केला आहे.
कर्मचाऱ्यांची करण्यात आली कोरोना चाचणी -
मे महिन्याच्या सुरुवातीला हैदराबाद येथील नेहरू झुलॉजिकल पार्क (NZP) येथे असलेल्या आठ सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासुनच महाराजबाग प्रशासन सतर्क आहे. माणसांप्रमाणेच आता कोरोनाच्या संसर्गाची लक्षण वन्य प्राण्यांमध्येही दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील प्रसिद्ध महाराजबाग प्राणी संग्रहालय प्रशासनाने सरसकट सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेतली होती. ज्यामध्ये सर्वांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता.
हेही वाचा - दिलासा.. राज्यात ऑक्सिजनची मागणी घटली.. कोरोनाची दुसरी लाट ओसरणीला !
प्राण्यांकडे दिलं जातंय विशेष लक्ष -
कोरोनाच्या पहिल्या लाटेतही अशाच प्रकारची घटना घडली होती. यात प्राणी संग्रहालयातील वन्यजीव प्राणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. मात्र, आता तर मानवापासून प्राण्यांमध्ये कोरोना संक्रमण होत असल्याचे निदान झाले आहे. यामुळे देशभरातील प्राणी संग्रहालयातील प्राण्यांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. भविष्यातील धोका टाळण्याच्या उद्देशाने नागपूर येथील महाराजबाग प्राणी संग्रहालय प्रशासनाने खास नियमावली तयार केली आहे. त्यानुसार या प्रत्येकाच्या कामाचे नियोजन केल जाते आहे.
कशी घेतली जातेय प्राण्यांची काळजी -
प्राण्यांच्या जवळ जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट आवश्यक करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच प्राणी संग्रहालयात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्राण्यांना दिले जाणारे अन्न आधी गरम पाण्यात उकळले जात आहे. त्यानंतरच ते प्राण्यांना दिल जात आहे. नव्या नियमावलीनुसार प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात आला आहे. प्राण्यांमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांची तपासणी केली जाणार असली तरी सध्या सर्व प्राणी सुरक्षित असल्याची माहिती महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बाविस्कर यांनी दिली.
हेही वाचा - कोरोना लसीची उपलब्धता न तपासता केंद्राचा 'लस उत्सव' - सीरमचे संचालक सुरेश जाधव