नागपूर: विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची गेल्या अनेक वर्षांची तयारी, जुन्या पेन्शनचा भावनिक विषय आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा शिवाय गाणारांबद्दलची अँटी इन्कमबन्सी हे अडबाले यांच्या विजयात महत्त्वाचे ठरले आहे. जुन्या पेन्शन योजनेला सत्ताधाऱ्यांनी स्पष्टपणे नकार दिल्यामुळे नाराज शिक्षकांनी मतांच्या स्वरूपात आपली नाराजी व्यक्त केली.
नागो गाणारांची हॅट्रिक हुकली: माजी आमदार नागो गाणार महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेचे नेते आहे. प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे. नागो गाणार गेली दोन टर्म नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून आमदार आहेत. तिसऱ्यांदा नागो गाणार हे निवडणूक जिंकून विजयाची हॅट्रिक साधतील, असा त्यांच्या समर्थकांना विश्वास होता.
गाणारांना सहकाऱ्यांची नाराजी भोवली: महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेतून अजय भोयर आणि इतर कार्यकर्त्यांनी ही उमेदवारी मागितली होती. मात्र, गाणार यांनी कोणाचीही डाळ शिजू दिली नाही आणि उमेदवारी स्वतःकडे ठेवली. याशिवाय भाजपमधील शिक्षक आघाडीमधून ही त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र अखेरीस गाणार हेच उमेदवार झाले. भाजपनेही त्यांना शेवटच्या क्षणाला आपला पाठिंबा जाहीर केला होता.
नागो गाणार यांचा परिचय: माजी आमदार नागो गाणार हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खास विश्वासू मानले जातात. एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख असली तरी त्यांच्यात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक आक्रमकता नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवला जातो.
विजयाची माळ अडबाले यांच्या गळ्यात : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे माजी आमदार नागो गाणार यांचा पराभव केला आहे. चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीने बाजी मारत भाजपला धुळ चारली आहे. त्यामुळे गडकरी फडणवीसांच्या बालेकिल्यात महाविकास आघाडीने गुलाल उधळला आहे.
पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. सुधाकर अडबाले यांनी पहिल्या फेरीतच पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. सुधाकर अडबाले यांनी भारतीय जनता पक्ष समर्थीत माजी आमदार नागो गाणार यांचा पराभव केला आहे.
अडबाले समर्थकांचा जल्लोष : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकालाची प्रतीक्षा संपली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबालें यांचा विजय झाल्याने अडबाले समर्थकांनी जल्लोष करण्यात सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांनी ढोलताश्याच्या गजरात गुलालाची उधळण सुरू केली आहे. सुधाकर अडबाले यांनी पहिल्या फेरीत पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करताच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. गेल्या एक दशकांपेक्षा अधिक काळापासून नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. मात्र, अडबाले यांनी अतिशय दमदार विजय मिळवल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपने याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघ देखील गमावला होता.