नागपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून एसटी बससेवा बंद होती. राज्य शासनाच्या बुधवारी झालेल्या निर्णयानुसार आंतर जिल्हा एसटी बससेवेला हिरवा कंदील दाखविण्यात आला. आजपासून राज्यभर आंतरजिल्हा बससेवा सुरू झाली. नागपुरातही प्रतीक्षेनंतर बससेवा सुरू झाली. प्रवाशांना मात्र या निर्णयाबाबत कल्पना नसल्याने नागपूर बसस्थानकावर मोजकेच प्रवासी पाहायला मिळाले.
बहुप्रतिक्षीत आंतर जिल्हा एसटी बससेवेला अटी शर्तीसह सुरुवात करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. संपूर्ण राज्यभर आंतर जिल्हा प्रवास करणे आता सोपे झाले आहे. यासाठी कोणत्याही प्रकारच्या ई-पासेसची गरज भासणार नाही. नागपुरातही बससेवा सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गणेशपेठ बसस्थानकावर लगबग पहायला मिळत आहे.
हेही वाचा - धक्कादायक...! रत्नागिरीत दोन लहानग्या मुलींसह विवाहितेची आत्महत्या
पाच महिन्यांपासून थांबलेली लालपरी आजपासून प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली खरी, मात्र बससेवा सुरू झाली याची बहुतांश प्रवाशांना माहितीच नसल्याने बसस्थानकावर मोजकेच प्रवासी दिसून आले. आज पहिला दिवस असल्याने प्रवाशांना याबाबत कल्पना नसेल, असा अंदाज वाहकांकडून व्यक्त केला जात आहे. असे असले तरी अनेक महिन्यांपासून अडकून असलेल्या प्रवाशांना आंतर जिल्हा बससेवेमुळे आपल्या गावी परत जाता येणार आहे. बसमध्ये सुरक्षित अंतराचे पालन होणार असल्याचे वाहकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करत बस सेवा आता प्रवाशांच्या सेवत रूजू झाल्याचे पहायला मिळत आहे.