नागपूर - नागपूर शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (बुधवारी) पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आता नागपूर शहरात दिवसाची संचारबंदी रद्द करण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री राऊत यांनी केली आहे. नव्या आदेशानुसार आता नागपूर महानगर व पोलीस आयुक्त परिसरात 31 मार्चनंतर केवळ रात्रीची जमावबंदी लागू असणार आहे. महानगरपालिका आयुक्तांचे सर्व आदेश रद्द करण्यात आले असून आता केवळ राज्य सरकारच्या आदेशांचे पालन केले जाणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे.
नागपूर शहरात कोरोनाची परिस्थिती गंभीर असली तरी नियंत्रणात असल्याचा दावा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. १ एप्रिलपासून जिल्हा प्रशासनाचे सर्व आदेश रद्द करण्यात आले असून केवळ आता राज्य सरकारच्या आदेशाचे पालन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. लॉकडाऊनमुळे गरिबांचा रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे सर्वांचे हित जोपासले जाईल असाच मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं देखील राऊत म्हणाले आहेत.
बेड उपलब्ध नाहीत
नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शासकीय रुग्णालय यासह खाजगी रुग्णालयातील बेडची क्षमता पूर्ण झालेली आहे. नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी स्वतः रुगणालयाचा दौरा करणार असल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. बेड्स मॅनेजमेंट योग्य पद्धतीने व्हावे याकरिता आमचे प्रयत्न असल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे.
'लसीकरण वाढवावे'
नागपूर शहरात सातत्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यातच आता मृत्यू संख्या देखील वाढत असल्याने नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी आले आहे. अशा बिकट परिस्थितीतून नागपुरला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी लसीकरणावर भर द्यावा, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा-ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट, रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने सज्ज रहावे - एकनाथ शिंदे