नागपूर - हिंगणा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मंगळवारी भेट घेतली. त्यामुळे घोडमारे राष्ट्रवादीत जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रवीण कुंटे-पाटील यांनी देखील या भेटीला दुजोरा दिला आहे. मात्र, भेटीत नेमकी काय चर्चा झाली? यावर त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले.
हेही वाचा - शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीत; विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता
भाजप आणि शिवसेनेत मेगाभरती चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. आघाडीच्या मोठ-मोठ्या दिग्गज नेत्यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत युती पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, अशातच राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा मिळेल, अशी घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण मतदारसंघ असलेला हिंगणा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण तिथे भाजपने आपला झेंडा रोवला. २००९ मध्ये हिंगणा विधानसभा मतदारसंघातून घोडमारे हे आमदार होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी विजय घोडमारे यांची भाजपने उमेदवारी नाकारली. घोडमारे हे तेव्हापासून नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी घोडमारेंना डावलून भाजपने समीर मेघे यांना उमेदवारी दिली आणि ते आमदार म्हणून निवडूनही आले.
हेही वाचा - 'आरे'वरून 'का'रे.. शिवसेना व भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर
यावेळीही मेघे यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याने नाराज असलेले विजय घोडमारे राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिंगणा येथून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
हेही वाचा - पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला 'गुडबाय'