नागपूर - मुंबई सारख्या महत्वाच्या शहरात चार-चार तास वीज पुरवठा खंडित होण्यासारखी घटना या आधी कधीही घडली नाही. हे अत्यंत दुर्दैवी असून आधुनिक महाराष्ट्राची बदनामी करणारी घटना असल्याचे वक्तव्य केले राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आहे.
गेल्या तीन दिवसांपासून कळवा-तळेगाव विद्युत वाहिनी बंद पडलेली होती. याकडे महावितरणने याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यानंतर आज (दि. 12 ऑक्टोबर) सकाळी कळवा-पडगे ही वीज लाईन बंद पडली. त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर मात्र कळवा-पडगा दुसरी लाईन बंद झाल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. मानवी चुकांमुळेच आज मुंबईवर ही दुर्दैवी परिस्थिती ओढवल्याचे देखील ते म्हणाले आहेत. वीज पुरवठा खंडित झाला यासाठी जरी तांत्रिक कारण पुढे केले जात असले तरी यासाठी कंपनीचा अक्षम्य दुर्लक्षपणा कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासाठी दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.
मुंबईत एक मिनिट जरी वीजपुरवठा खंडित झाला तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. मात्र, आज ठिकठिकाणी कोविड सेंटर सुरू आहेत. अचनाक वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक अडचणी उद्भवल्या आहेत. यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करावी तसेच भविष्यात अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा - लुसीच्या वाढदिवसाचा थाटच न्यारा; विशेष शुभेच्छुकांच्या गर्दीमुळे कार्यक्रमात आली रंगत