नागपूर - विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 20 ते 23 एप्रिल दरम्यान अनेक भागात विजांचा कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वारे वाहतील, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाचं विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअसवर गेल्याने काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने हिट वेव्हचा इशारा दिला होता. मात्र, अचानक वातावरणात बदल झाल्याने हा इशारा मागे घेण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या ( Meteorological Department ) माहितीनुसार पुढचे काही दिवस राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीतील पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
तापमानात घट, मात्र उष्णतेचा प्रकाप सुरूच - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. दुपारी ऊन पडले असले तरी तापमानात घट झाली आहे. मात्र, उष्णतेचा प्रकाप सुरूच असल्याने उकाडा वाढला आहे.
हेही वाचा - President Ramnath Kovind Nagpur Tour : 23 एप्रिलला राष्ट्रपती रामनाथ कोविंद नागपुरात