नागपूर - आजच्या धावपळीच्या जगात फास्ट फूड आणि जंक फूडने अनेकांच्या मनात घर केले आहे. यात मुख्यत्वे तरुण पिढी सर्वात पुढे आहे. बरीच मुलं महाविद्यालयातील कॅन्टीनमध्यल्या फास्टफूडवर ताव मारतात. पण अन्न आणि औषधी प्रशासनाने आता यावर कंबर कसली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या नव्या नियमानुसार महाविद्यालयातील जंक फूड म्हणजेच पिझ्झा आणि बर्गरवर बंदी घालण्यात आली आहे. नागपुर शहरातील ६८ तर संपूर्ण नागपूर विभागातील २६५ महाविद्यालयांना याबाबत अन्न औषधी प्रशासन विभागान पत्र पाठवले आहे.
या बाबीवर विभागाचे अधिकारी महाविद्यालयाच्या कॅन्टीनकडे लक्ष ठेवणार आहेत. बंदी असून देखील कॅन्टीनमध्ये फास्टफूडची विक्री केली तर कॅन्टीनसह महाविद्यालयीन प्रशासनावर देखील कारवाई करण्यात येईल अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिभेची चव म्हणून तरुण पिढी मोठ्या प्रमाणात जंक फूडच्या आहारी गेली आहे. याचे दुष्परिणाम त्यांचा आरोग्यावर होत आहेत. या जंकफूडमुळे तरुणांमध्ये लठ्ठपणापणा आणि मधुमेहाचे प्रमाण बघायला मिळत आहे. या सर्व गोष्टींमधून तरुणांची सुटका व्हावी या उद्देशाने प्रशासनाने ही बंदी घातली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.