नागपूर - नागपूर शहरातील सीए मार्गावर असलेल्या गीतांजली चौकात आज (9 ऑगस्ट) पहाटे एका मोसीन नावाच्या गुंडावर गोळीबार झाला. मोसीनच्या पायाला गोळी लागली आहे. त्याला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात आले आहे. सध्या मोसीनची स्थिती सामान्य असल्याचे समजते आहे. ही घटना आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
गीतांजली चौकात गोळीबार
ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली आहे. मोसीनचा पाठलाग करत काही आरोपी त्याच्यामागे धावत होते. आरोपींनी मोसीनला गीतांजली चौक परिसरात गाठले. एका पांढऱ्या रंगाच्या गाडीमधून आलेल्या आरोपींनी मोसीनवर गोळीबार केला. एक गोळी मोसीनच्या पायाला लागली. त्यानंतर आरोपी मोसीनला जखमी अवस्थेत सोडून पळून गेले. स्थानिकांच्या मदतीने मोसीनला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच तहसील पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
मोसीन जीव वाचवण्यासाठी पळत होता. त्याचा पाठलाग आरोपी करत असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी गोळीबार
मोसीनचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्याचा गेल्यावर्षीपासून प्रतिस्पर्धी गटासोबत वाद सुरू होता. काल संध्याकाळी देखील वाद झाल्याची माहिती पुढे आली आहे. या वादाचा वचपा काढण्यासाठी प्रतिस्पर्धी गटाने मोसीनवर गोळीबार केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पुण्यातही गुंडांच्या टोळीवर झाडल्या 6 गोळ्या
पुण्यातील वारजे येथील शिवणे परिसरामध्ये पूर्ववैमनस्यातून एका टोळीने पाठलाग करून दुसऱ्या गुंडांच्या काळ्या रंगाच्या कारमधून निघालेल्या तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. केदार शहाजी भालशंकर (वय २७, रा. रामनगर लक्ष्मी चौक वारजे) असे त्याचे नाव आहे. निलेश गायकवाड व त्याच्या साथीदाराने हा गोळीबार केल्याचे समजते आहे. काल (8 ऑगस्ट) मध्यरात्री ही घटना घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे. कायद, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - पोलीस ठाण्यांत मानवाधिकाराला सर्वाधिक धोका - सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा