नागपूर : विशेष सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती ओ. पी. जयस्वाल यांनी आरोपीला लैंगिक अपराधांपासून बालसंरक्षण अधिनियम कलम ४(२) आणि कलम ६ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. घटेनच्यावेळी या प्रकरणातील मोठी पीडित मुलगी १४ तर लहान मुलगी ही १२ वर्षाची होती. आरोपीने स्वतःच्याच दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना नागपूर शहरात राहत्या घरी जून २०१९ ते १३ नोव्हेंबर २०२० या कालावधीत घडली होती. आरोपी हा ऑटोचालक आहे. त्याची पत्नी गर्भवती असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी नराधम बापाने दोन्ही मुलींना जीवे मारण्याची धमकी देवून सलग दीड वर्ष बलात्कार केला.
त्यामुळे प्रकरण आले पुढे : या प्रकरणातील दोन्ही पीडित मुली राहण्यास त्यांच्या मामाकडे गेल्या होत्या. 15 दिवसांनी जेव्हा त्यांना घरी जायचे होते, त्यावेळी त्या घरी जाण्यासाठी तयार होत नव्हत्या. दोन्ही मुलींना रडू अनावर होत होते. तेव्हा त्यांच्या मामांनी दोघींना विश्वासात घेऊन त्यांची चौकशी केली होती. तेव्हा त्यांनी वडिलांकडून सुरू असलेल्या पाशवी अत्याचाराचा पाढा वाचला. हे सर्व ऐकून मुलींच्या मामाने दोघींना धीर देत थेट पोलीस स्टेशन गाठले. दोन्ही मुलींनी वडिलांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
आरोपीच्या कुटुंबातील लोकांना शिक्षा : आरोपीने पत्नीचे निधन झाल्यानंतर दुसरे लग्न केले होते. त्यानंतर देखील आरोपीने स्वतःच्या मुलींवर अत्याचार सुरूच ठेवला होता. या सर्व प्रकरणाची माहिती आरोपीच्या दुसऱ्या पत्नीसह मोठा भाऊ आणि वहिनीला देखील होती. मात्र त्यांनी यासंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात दिली नाही. त्यामुळे विशेष सत्र न्यायालयाने आरोपीच्या नातेवाईकांना पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणातील दोन्ही पीडित मुली अल्पवयीन आहेत. त्यामुळे त्यांचे शिक्षण आणि योग्य पुनर्वसनासाठी पावले उचलावी, असे आदेश न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांना दिले आहेत.
25 जानेवारीची घटना : नागपूरच्या सावनेर तालुक्यात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोघांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती. शाळा सुटल्यावर पीडित मुलगी घरी जाण्यासाठी पायी निघाली होती. ओळखीतील दोन तरुणांनी तिला कारने घरी सोडून देण्याची बतावणी केली होती. आरोपी पीडित विद्यार्थीनीच्या ओळखीचे होते. या अगोदर नागपूर शहरातील हुडकेश्वरमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती.