नागपूर - राज्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असलेला नागपुरातील सराईत गँगस्टर संतोष आंबेकरचे साम्राज्य आता उद्धवस्त झाले आहे. पोलिसांनी आंबेकरच्या मुसक्या आवळ्यानंतर अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू केली. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर त्याचा इतवारी परिसरातील अनाधिकृत बंगला मंगळवारी पाडण्यास सुरुवात केली. त्यासाठी मनपाने 2 जेसीबी आणि 1 पोकलँडच्या मदतीने ही कारवाई केली. बंगला पाडताना तणाव निर्माण होऊ शकतो, त्याकरिता परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.
हेही वाचा - बाल हट्टापायी जनतेवर कराचा बोजा लादला जातोय का? शेलारांचा शिवसेनेला सवाल
नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुख्यात डॉन संतोष आंबेकर याचा बंगला आहे. कुख्यात गुंड आंबेकर याच्यावर ऑक्टोबर 2019 मध्ये पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. आंबेकरवर आतापर्यंत मारहाण, बलात्कार, खंडणी, अपहरण यासारख्या विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आंबेकर हा सध्या कारागृहात असून, त्याच्याविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी ऑक्टोबरपासून आंबेकर विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली होती. ज्यानंतर त्याची 5 कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली होती.
आंबेकर राहत असलेल्या आलिशान बांगला हा अनधिकृत असल्याचे सांगत महापालिकेच्या मदतीने हा बंगला रिकामा करण्यात आला होता. अनाधिकृत बांधकाम असल्याने बंगला पडण्याची नोटीस देण्यात आली होती ज्या विरुद्ध आंबेकरच्या कुटुंबीयांनी महापालिकेत अपील केले होते. हे अपील खारीज झाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश दिले ज्यानंतर अनधिकृत बंगला पडण्याच्या कामाला सुरुवात झाली. जयपुरी दगडाने सजवलेला हा प्रशस्त बंगला पाडण्याचे कार्य पुढील 2 ते 3 दिवस सुरू राहणार आहे.
हेही वाचा - उन्नाव प्रकरण: दोषी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर याचे विधानसभा सदस्यत्व रद्द