नागपूर Dhananjay Munde On Eknath Shinde : विधानसभेमध्ये सोमवारी (18 डिसेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पाऊस, गारपीट यामुळं झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी मदतीत तीन हेक्टरची वाढ करत 13 हजार 600 कोटींची मदत शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे आभार मानले.
काय म्हणाले धनंजय मुंडे? : अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आज फार मोठा दिलासा दिलाय. "जिरायती शेतीमध्ये सोयाबीनचं पीक, कापसाचं पीक घेतलं जातं. तसंच आंतरपीक म्हणून मूग, तूर, उडीद ही पिकं घेतली जातात. या सर्वांना प्रचलित दोन हेक्टरच्यावर एक हेक्टरची वाढ करत 13 हजार 600 कोटींची मदत शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय घेण्यात आलायं. तसंच बागायती शेतीसाठी अतिवृष्टीमध्ये किंवा गारपीटीनं ज्यांचं नुकसान झालं अशा बागायतदार क्षेत्रामधील शेतकऱ्यांना 27 हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36 हजार प्रतिहेक्टरी मदतीची तरतूद मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीय. या निर्णयाबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो", असं धनंजय मुंडे म्हणाले.
अनिल देशमुखांवर केली टीका : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर टीका करत धनंजय मुंडे म्हणाले की, "अनिल देशमुख हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधीच गंभीर झाल्याचं मी बघितलं नाही. त्यामुळं देशमुखांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असती, तर कदाचित मी जसं या निर्णयाचं स्वागत केलं, तसंच त्यांनीही केलं असतं. राजकीय विरोध सोडून शेतकऱ्याच्या जातीतले म्हणून त्यांनी सुद्धा या निर्णयाचा स्वागत करायला हवं".
हेही वाचा -