नागपूर - विधानसभा निवडणुकीत जनतेनं सर्वाधिक मतांनी भाजपला निवडून दिले आहे. मात्र, मेरीटमध्ये आलेला विद्यार्थी वर्गाबाहेर आणि ४० टक्के गुण घेणारे तिन्ही पक्ष एकत्र येऊन मेरटीमध्ये आल्याचे सांगत आहेत. विश्वासघातानं आलेलं कोणतेही सरकार देशाच्या इतिहासात फार काळ चालले नाही. त्यामुळे हेही सरकार फार काळ टिकणार नसल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला.
जनतेचा कौल मिळून देखील आम्ही बाहेर आहोत आणि विश्वासघात करुन युती तोडून ते सत्तेत आहेत. विश्वासघातानं तयार झालेलं सरकार देशाच्या इतिहासात फार काळ चालत नाही, हे सरकारंही फार काळ चालणार नसल्याची टीका फडणवीस म्हणाले. विश्वासघात करण्याची मालिका सत्तेतील तिन्ही पक्षानं सुरू ठेवलीय. अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची २५ हजार रुपये मदत केली नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप ते दिले नाही. तसेच सरसकट कर्जमाफी करणार असल्याचेही सांगितले होते, मात्र, यातील काहीच केले नाही. त्यामुळे हे सरकार फसवं असल्याचे फडणवीस म्हणाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आयोजित डीगडोहच्या सभेत फडणवीस बोलत होते. २०१४ च्या जाहिरनाम्यात आश्वासन न देताही आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असल्याचे फडणवीस म्हणाले.