नागपूर : मुंबईत कराची स्वीट्स या नावाने असणाऱ्या दुकानाचे नाव बदलावे, अशी मागणी शिवसेनेचे नितीन नांदगावकर यांनी केली होती. या दुकानाच्या मालकाला, दुकानाचे नाव बदला नाहीतर दुकान चालू देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतर या प्रकरणावरुन भाजप आणि सेनेमध्ये जुंपली आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे याबाबत म्हणाले की, "कराची देखील भविष्यात भारताचा भाग होईल." तर, याला सेना खासदार संजय राऊत यांनी "आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा, मग कराचीचं बघू" अशा शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले आहे.
काय आहे प्रकरण..?
बेधडक कामासाठी प्रसिद्ध असलेले नितीन नांदगावकर यांनी मागील आठवड्यात कराची स्वीट्स या दुकानात जाऊन दुकानचालकाला थेट इशारा दिला. "मुंबईत आणि महाराष्ट्रात यापुढे कराची नाव चालणार नाही. पाकिस्तानातील कराची म्हणजे नामचीन दहशतवाद्यांचा अड्डा आहे. मग त्यांचा महाराष्ट्रात उदो उदो कशाला? मुंबईत राहता मग मुंबईचा अभिमान बाळगा. पाकिस्तान आणि कराचीच्या आठवणी मुंबईत चालणार नाहीत. कराची बेकरी, कराची स्वीट, कराची स्कूल मुंबईत चालणार नाहीत. १५ दिवसांत कराची नावे असलेल्या पाट्या बदला", असे नांदगावकर यांनी सांगितले होते. इशारा मिळाल्यानंतर दुकानदाराने दुकानाचे नाव झाकले होते.
कराची बेकरी आणि पाकिस्तानचा संबंध नाही..
यानंतर, कराची बेकरी आणि कराची स्वीट्स 60 वर्षांपासून मुंबईसह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते.
काय म्हणाले फडणवीस..?
कराची बेकरी प्रकरणात फडवणीस म्हणाले होते, की "आम्ही 'अखंड भारत' या विचारसरणीवर विश्वास ठेवतो. त्यामुळे कराचीदेखील भविष्यात भारताचा भाग होईल."
हेही वाचा : अर्णब प्रकरण : रायगड न्यायालयातील पुनर्विचार याचिका, जामीन अर्जाबाबत आजच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष