नागपूर - काँग्रेसने रामटेक लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार मुकुल वासनिक यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्याकरता पत्रकार परिषद घेऊन आपली मागणी काँग्रेस अध्यक्षांपर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याकरिता केवळ सोमवारचा दिवस शिल्लक आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण असेल? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. राज्यातील माजी मंत्री नितीन राऊत आणि किशोर गजभिये दोघेही रामटेक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्यापैकी कुणाच्याही नावाची घोषणा झालेली नाही.
गेल्या २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक विजय झाले होते. त्यानंतर २०१४ ला शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी वासनिक यांचा पराभव केला होता. २०१९ च्या निवडणुकीतही मुकुल वासनिक रामटेकमधून काँग्रेसचे उमेदवार असतील अशा प्रकारची शक्यता प्रारंभिक काळात व्यक्त केली जात होती. मात्र, खुद्द मुकुल वासनिक यांनी निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुकुल वासनिक यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा आदेश द्यावा, या मागणीकरिता नागपूर ग्रामीणचे काँग्रेस कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी पक्षश्रेष्ठींना कळवली असल्याचे स्पष्ट केले.