नागपूर- शहराच्या जुन्या कामठी परिसरात २००० रुपयांसाठी युवकाची हत्या झाल्याचा प्रकार पोलीस तपासाअंती समोर आला आहे. महिनाभरापूर्वी युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकण्यात आला होता. तब्बल महिनाभर या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. मात्र गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तर एक फरार आहे.
शेख मतीन असे मृताचे नाव आहे. १४ जुलै रोजी जुन्या कामठी परिसरातील एका विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात तपास सुरु केला. मात्र पोलिसांना या घटनेबाबत पुरावा न मिळाल्याने आरोपींचे शोध घेणे अशक्य झाले होते. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे सुद्धा कठीण झाले. कामठी पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यात अपयश आल्यानंतर या खुनाचा तपास गुन्हे शाखा पोलिसांकडे सोपवण्यात आला होता.
गुन्हे शाखने या प्रकरणात तांत्रिक बाबींचा आधार घेत मृतकाची ओळख पटवण्याला प्राधान्य दिले. त्यांच्या तपासातून अज्ञात मृतदेह शेख मतीन या कुल्फी विक्रेत्याचे असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरविले आणि त्याचे मित्र शोधून काढले. त्याद्वारे पोलिसांना एका ऑटो रिक्षा चालकाचा सुगावा लागला. तो मतीनचा मित्र होता.
मतीनने या मित्राकडून २००० रुपये उधार घेतले होते. मात्र, मतीनकडून पैसे परत मिळत नसल्याने दोघात भांडण झाले, त्याच भांडणातून आरोपी महेश खरे याने मतीनच्या डोक्यात दगडाने मारून त्याची हत्या केली. त्यानंतर मित्राच्या मदतीने तो मृतदेह विहिरीत फेकून दिला. पोलिसांनी मात्र या प्रकरणाचा मोठ्या शिताफीने तपास केला आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या.