नागपूर - नागपुरात मागील तीन दिवसात दोन हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित रूग्ण आढळले. प्रयत्न करूनही रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने कडक लॉकडाऊन लावण्यात आला. मात्र, दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर लोकांची गर्दी दिसली. सकाळची वेळ असल्याने अत्यावश्यक सेवेत किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोक घराबाहेर पडलेले दिसून आले. अनेक लोक विनाकारण फिरत होते. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवून नागरिकांवर कारवाई करणारे पोलीस मात्र, दुसऱ्या दिवशी गायब होते. तुरळक ठिकाणी एखाद-दोन पोलीस कर्मचारी दिसत होते.
दुसऱ्या दिवशी रस्त्यावर मोजकेच पोलीस -
लॉकडाऊनला यशस्वी करण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. यामुळे लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागपुरातील रस्त्यांना छावणीचे स्वरूप आले होते. मात्र, आज(मंगळवार) सकाळी मोजकेच पोलीस कर्मचारी दिसून आले.
पहिल्या दिवशी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई -
लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी विनाकारण फिरणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. अनेकांना रस्त्यावर थांबून फिरण्याची कारणे विचारण्यात आली. दिवसभरात चार हजार लोकांवर पोलिसांच्यावतीने कारवाई करण्यात आली तर, 1 हजार 300 वाहने ताब्यात घेण्यात आली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 'घरात राहा सुरक्षित राहा', असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले.