नागपूर - जिल्ह्यातील काटोल कळमेश्वर परिसरात अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारांच्या माऱ्यामुळे झाडावरचे संत्रे गळून पडले आहेत. ज्यामुळे, आधीच आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांवर निसर्गाचे दुहेरी संकट ओढवले आहे.
दोन महिन्यांपूर्वी संत्रा तोडणीवर येण्याच्या मार्गावर असतानादेखील अवकाळी पावसाने नागपूर शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढले होते. त्यावेळी झालेल्या नुकसानाची भरपाई होण्याआधीच पुन्हा एकदा संकट विदर्भातील फळबाग शेतकऱ्यांवर आले आहे.
गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. गुरुवारी रात्री 2 च्या सुरमास वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीट आणि पावसामुळे कोलमडलेल्या शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. जिल्ह्यातील इसापूर, झिपला, बोरी, मेंडकी, चिखली, गोधनी या गावांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोसंबी, संत्रा, कापसाचे तसेच गहू,हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.