नागपूर - एकीकडे चिनी वस्तूंवर व मोबाईल अॅपवर बहिष्कार टाकण्याची मागणी होते आहेत. तर दुसरीकडे नागपुरातील गुंड चायनीज अॅप असलेल्या टिक-टॉकच्या प्रेमात पडलेत की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नागपुरात सध्या गुन्हेगारांनी आणि गुन्हेगारीचा आकर्षण असलेल्या बेजबाबदार तरुणांनी टिकटॉकच्या माध्यमातून आपली दबंगगिरी प्रस्थापित करण्यासाठी व एकमेकांना धमकावण्यासाठी टिकटॉकचा वापर करत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.
एकमेकांना पाहून घेण्याच्या भाषेसह थेट कायदा आणि पोलिसांना आवाहन देण्याची भाषा या व्हिडिओच्या माध्यमातून केली जात आहे. कोणी दुसऱ्याला ठोकण्याची धमकी देत आहे तर कोणी वाईट कमेंट बद्दल दुष्परिणामांचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे अनेक नागपूरकरांनी गुन्हेगारांकडून असा गैरवापर होत असताना पोलिसांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे या टिकटॉक प्रेमी गुंडांमध्ये सर्वाधिक समावेश नवख्या गुंडांचा आहे. जे गुन्हेगारी क्षेत्रात आपले स्थान आणि दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. एकीकडे जून महिन्याचे नागपूर शहरात तब्बल 16 खुनाच्या घटना घडल्या असताना आता टिकटॉकच्या माध्यमातून गुंड आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांना रोखण्याचे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान देखील निर्माण झाले आहे.
चीनच्या लष्कराने भारतीय सीमेत अतिक्रमण करण्याच्या प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पडल्यानंतर चीनला आर्थिक दणका देण्याची भावना भारतीय नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. अर्थात ही मोहीम केवळ सोशल मीडियापूर्ती मर्यादित आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे. त्याचबरोबर चायनीज मोबाईल अॅपवर सुद्धा बहिष्कार टाकण्यात यावा, असे आवाहन केले जात आहे. यासर्व पार्श्वभूमीवर देशात 'बायकॉट चायना' मोहीम सुरू झाली आहे. मात्र, नागपुरात गुन्हेगारी जगतात सक्रिय गुंड चिनी अॅप टिकटॉकचा पुरेपूर उपयोग करून आपला विस्तार करण्याचा प्रयत्नांत दिसत आहेत. पोलिसांनी वेळीस या गुंडांवर आवर घालणे गरजेचे आहे.
हेही वाचा - सोशल डिस्टन्सचा फज्जा कुणी केला हे आधी तपासा; महापौर जोशींचे 'आप'ला प्रत्युत्तर