नागपूर - राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात गेल्या 24 तासात 70 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 681 इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. चाचणी सकारात्मक आल्यावर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत 25 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 315 इतकी झाली आहे. या शिवाय आतापर्यंत एकूण 25 कोरोनाबधितांची मृत्यू झाला आहे. सध्या नागपूरात 341 सक्रिय रुग्णांवर मेयो, मेडिकल, एम्स आणि लष्करी रुग्णालय कामठी येथे उपचार सुरू आहेत. नागपूरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 81 टक्के इतके आहे.
देशात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. त्यात दिवसेंदिवस झपाट्याने वाढही होत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला आहे. अनलॉक-१ प्रमाणेच अनलॉक-२ मध्येही काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.